Saturday, December 1, 2007

एक रविवार घाईचा

भारताबद्दल आणि भारतात राहण्याबद्दल माझे विचार लिहित बसण्यापेक्षा मी एका चांगल्या गेलेल्या दिवसाचं आणि एका रटाळ दिवसाचं वर्णन करतो, म्हणजे वाचणाऱ्यांना इथल्या दिनक्रमाचा अंदाज येईल. तर पहिली गोष्ट आहे एका अचानक आलेल्या सोनेरी रविवाराची.

अदल्या रात्री घरी बरेच पाहुणे येऊन गेल्यामुळे रात्री झोपायला जवळजवळ दोन वाजले होते (पुण्यात सर्वांनाच वाद घालायची हौस आणि माझे अमेरिकेतुन परत आलेले दोन पुणेरी मित्र आल्यामुळे वाईनच्या साथीने भारत / अमेरिका ह्या माफक विषयावर आम्ही रात्रभर उहापोह केला होता). त्यामुळे सकाळी ७ वाजता दूधवाल्याने जेंव्हा बेल वाजवली तेंव्हा थोडा वैतागूनच मी जागा झालो. धडपडत जिना उतरून पिशवी घेतली तसा तो म्हणाला "साहेब बाहेर एक पिशवी का नाही लाऊन ठेवत - मी त्यात दूधाच्या पिशव्या ठेवत जाईन..." अर्धवट झोपेत मी होय होय काहीतरी पुटपुटलो व परत जाऊन झोपलो. कधी नव्हे ते पुण्यात थंडी पडली होती, त्यामुळे माझी झोप खरं म्हणजे गेलीच होती. तरीही मी आपली "निसटून रात्र गेली" वगैरे विचार करत पुन्हा पडी टाकली.

थोड्याच वेळात हिनी उठवलं "अरे अवंती येणार आहे ना? ऊठ! ऊठ!!" - अरे हो की! हिच्या मावस बहिणीला सकाळी नाश्त्याला बोलावलं होतं म्हणून जरा सुस्थितीत असणं प्राप्त होतं. नाहीतर सासरी काय काय बातम्या पसरल्या असत्या कोणास ठाऊक! थोड्याच वेळात ते दोघं आणि त्यांची ७ वर्षांची मुलगी घरी आले. येता येता त्यांनी गरम गरम पॅटिस आणले हे बरं केलं - म्हणजे हिनी केलेला शिरा मला आवडला नाही असं नाही, पण आमच्या घरी पॅटीस आवडणारा मी एकटाच असल्याने मला सकाळी घरच्या घरी पॅटीस खाण्याचा योग क्वचितच येतो!

तर त्यांच्याशी काम असं होतं की आम्हाला गोव्याच्या सहलीचं नियोजन करायचं होतं आणि सत्यजित हा ट्रॅवल एजंट असल्यामुळे त्याच्याशी आम्हाला बोलायचं होतं. थोड्याफार गप्पांनंतर आमचं काम पण झालं आणि ते निघाले - बघितलं तर बोलण्यात १ कधी वाजला हे कळलंच नाही.

माझी मामे बहिण कोल्हापूरहून कल्याणला परत जाताना वाटेत तिच्या आई-बाबांना (म्हणजे माझ्या मोठ्या मामा-मामीला) पुण्यातून घेऊन जाणार होती. माझ्या आईला ते जायच्या अगोदर त्यांना काही वस्तू द्यायच्या होत्या, पण ते माझ्या धाकट्या मामाकडे राहात असल्यामुळे मी आईला कळवलं होतं की मी गाडीनी तिला घेऊन जाईन. म्हणून मी लगेच निघालो आणि आईला तिच्या घरुन घेतलं. आईनी सांगितलं माझ्या बहिणीलापण मामाला भेटायला यायचय, म्हणून मग वाटेत तिला पण घेतलं आणि आमचं लटांबर मामाकडे पोहोचलं. मामाच्या घरी त्याच्या कुत्रीनं आमचं यथार्थ स्वागत केलं म्हणजे अगदी पाय धुण्याऐवजी पाय चाटून पुसून काढले!

काही वेळात मामे बहिण तिच्या दोन गोड मुलींना घेऊन आली व एकीचं कुत्र प्रेम व दुसरीची कुत्र्याबद्दलची भीती ह्यावरून दोघींच्या फिरक्या घेण्यातच खूप वेळ गेला. मामीनी केलेली चहा भजी वडे वगैरे खाता खाता एकीकडे क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवताना बघताना लै धमाल आली. मोठ्या मामाच्या विषेश टिपण्ण्यांनी मॅच अधिकच खमंग केली. बाहेर पुण्याच्या त्या दिवशीच्या कोवळ्या उन्हात झोपाळ्यावर मुली दंगा करत होत्या आणि मामाच्या कुत्रीला अधिकच चेव येत होता. असं सगळं करण्यात खूप उशीर झाल्याची पुन्हा जाणीव झाली.

आम्हाला संध्याकाळी गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं होतं आणि मी अजून इथेच! गडबडीने सर्वांना टाटा बायबाय करून आम्ही परत घरी पोहोचलो, मुलांना आणि बायकोला पटकन् गाडीत घातलं आणि मुलांना मराठीच्या शिकवणीला सोडलं. वाटेत बाबांना फोन केला की त्यांनी शिकवणीतून मुलांना घेऊन घरी जावं. आई-बाबा रांगोळीच्या प्रदर्शनाला जाणार होते, तर ते मुलांना घेऊनच जातील असं ठरलं.

नेहमी प्रमाणे आम्ही गाण्याच्या कार्यक्रमाला साधारण अर्धा तास उशीराच पोहोचलो, आणि नेहमी प्रमाणे आम्ही बसलो आणि पडदा सरून कार्यक्रम त्याक्षणी सुरू झाला! कार्यक्रम होता संजीव अभ्यंकर व अश्विनी भिडे यांचा. साथीला आजकालची नवोदित कलाकार सायली ओक पण होती. तबल्यावर पण परिचयाचेच कलाकार होते. मध्यंतरापूर्वी प्रत्येकी एक एक राग म्हणुन झाले, पण तेंव्हासुद्धा संजीवनी मारव्याचा कहर केला. उत्तमोत्तम ताना, सुस्पष्ट स्वर आणि खर्जातल्या खोलीपासून तारसप्तकातल्या ऊंची वर आत्मविश्वासानी स्वैर धावणारा त्याचा आवाज ह्यांनी कमाल केली.

मध्यंतरात वडे, कोकम सरबत, चहा वगैरे जीवनावश्यक गोष्टींचा भरपूर मारा करुन पुन्हा कार्यक्रमाची सुरवात झाली ती जसरंगी जुगलबंदीने. हा गायनप्रकार मी आधी एकदा सीडीवर ऐकला होता, पण प्रत्यक्ष ऐकण्याची माझी पहीलीच वेळ होती. ही एक आगळी वेगळी जुगलबंदी आहे. एक गायिका व एक गायक असतात. गायिका एक राग म्हणत असते, व त्याच वेळी गायक त्याच्या वेगळ्या पट्टीत दुसराच राग म्हणत असतो! पण निर्बंध असा असतो, की गायिकेच्या रागाच्या स्वरांची पट्टी बदलली की गायकाच्या रागाचे स्वर येतात. म्हणजे ऐकताना दोन्ही रागांमधले भाव वेगळे वगळे कळत असतात, पण बेसूर वाटत नसतं कारण तेच स्वर दोघांकडून ऐकू येत असतात आणि शिवाय गाण्याचे शब्द तेच असतात, म्हणून जेंव्हा दोघं एकदम्‌ गाणं म्हणतात तेंव्हा दोघांच्या तोंडून तेच शब्द (पण आपापल्या वेगळ्या रागांत) येत असतात.

अश्विनी भिडे गात होत्या संपूर्ण मालकंस आणि संजीव अभ्यंकर गात होते भीमपलास. जुगलबंदी रंगात येत होती - कधी अश्विनीची तान संपली की संजीव सुरू करायचा, कधी दोघेही आपल्या ताना थोड्याश्या एकमेकांवर पडू द्यायच्या आणि समेला येताना बरेचदा दोघेही एकदम्‌ गात असायचे. म्हणजे कधी वाटायचं की अश्विनीच्या मालकंसाने विचारलेल्या प्रश्नांना संजीवच्या भीमपलासाने खेळकर उत्तरं येत आहेत तर कधी वाटायचं की प्रश्नोत्तरं एकमेकांवर पडून एक वेगळाच अल्लड संवाद होत आहे. जशी लय चढत गेली तसे मालकंसाच्या तानांचे प्रश्न अधिकच क्लिष्ट होऊ लागले, पण त्यांना भीमपलासाकडून मस्त खेळकर आणि कधी सांत्वनाची उत्तरं यायची. हा वाद विकोपाला जाणार काय अशी भिती वाटताच इतका सुरेल संवाद ऐकायला मिळाला की मन अगदी प्रसन्न झाले. अंगावर शहारेही येत होते आणि सर्व टिळक स्मारक मंदीर प्रत्येक तानेला यथेच्छ टाळ्यांची आणि वाहवांची साथही देत होतं.

पण मुलांच्या काळजीने मात्र आम्ही पहिली जुगलबंदी संपताच निघालो आणि आई-बाबांकडे पोहोचलो. तिथे कळलं की मुलं आई-बाबांकडेच जेऊन माझ्या म्हेवण्याबरोबर बॅडमिंटन खेळायला गेली आहेत. मग उशिरा का होईना आम्हीपण तिकडे जाऊन थोडी फुलं धोपटली आणि शेवटी थंडीत कुडकुडत असलो तरी कोंडाळकराकडची मस्तानी हाणून घरी पोहोचलो.

असां सजला आमचा पुण्यातला एक गडबडीचा रविवार!