Wednesday, July 30, 2008

बांधा रे बांधा

शेतीची सुपीक जमीन मिळवा भाजीच्याच भावावर
कुंपण लावा, बेघर करा अशिक्षित ते खेडेकर

नद्यांकाठची वाळू उपसा, कोंबा जुनाट धुराडी ट्रकांवर
असह्य भार त्यांवर घालून खुशाल तुडवा वाटेत कोणी येईल तर

चिकण मातीच्या भाजा विटा ओकत धूर परिसरावर
त्याही भरा अशाच, आणा सगळं आमच्या प्लॉटावर

झाडं तोडा, मजले चढवा टीडीआर् ची करून अफरातफर
पार्किंगच्या जागीही बसवा दुकानांचे फर्निचर

रस्त्यांवरतीच लावा तुमच्या वाहनांचे ते लटांबर
ट्रॅफिकने तुंबूदेत रस्ते, गोंगाटाचा होऊदे कहर

विलायती नावं द्या, शोधा लोनधारी कस्टमर
नोटांच्या राशी भरा घेऊन "वरचा" पैसा खंडी भर

थोडा वाटा, थोडा ओता वाढदिवसांच्या जाहिरातींवर
उरला लावा नवीन प्लॉटांत, नाहितर चमकत्या गाड्यांवर

काही बाकी राहील तो आमची मुलंच उधळतील दारू वर
उद्यानं, अंगणं उरलीच नाहीत, मग करतील काय ते विसावल्यानंतर?